कर्तव्य भूमिती, घन भूमिती व अक्षरलेखन
(Plane Geometry, Solid Geometry & Lettering)

चित्रकलेच्या परीक्षेत हा विषय का ठेवलेला आहे असा प्रश्न बरेच विद्यार्थ्यांना पडतो. त्यांनी हे लक्षात घ्यायचे आहे. काटेकोरपणा, अचूकता हा चित्रकलेतील एक महत्वाचा भाग आहे. स्थिरचित्र, स्मरणचित्र व संकल्पचित्र या विषयांमधून विद्यार्थ्याचे हे गुण तपासले जात नाहीत. त्यासाठी कर्तव्य भूमिती हा विषय असतो. ही कर्तव्य म्हणजे कृतीयुक्त भूमिती आहे. यात विद्यार्थ्याला केवळ भौमितिक सिद्धांत माहिती असणे इतकेच अपेक्षित नाही; तर त्या सिद्धांतांचा उपयोग व्यवहारात करता येणे व अचूक आकृती काढता येणे अपेक्षित असते. उदा. तुम्हाला काटकोन किंवा लंब काढायचा असेल आणि तुम्ही तो गुण्या किंवा कोनमापक वापरून काढला तर तो चूकीचा ठारेल.तो कम्पासने कंस करूनच काढला पाहिजे. या पद्धतीने एखाद्या भूखंडावर ५० मीटर X ५० मीटर आकाराचा चौरस सुद्धा अचूक काढता येतो.

९ सेमी लांबीच्या रेषेचे दोन समान भाग तुम्ही जर ३ सेंटीमीटरवर एक बिंदू काढून केलेत तर चूक दिले जाईल. कारण तुम्ही यासाठी ९ ÷ ३ = ३ या गणिताचा वापर केला, भूमितीचा केला नाही.

म्हणजेच यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

१. योग्य भौमितिक पद्धतीचा अमलबजावनी करणे.

२. आकृती तंतोतंत, काटेकोर काढणे.

आता परीक्षेत आकृत्या काढताना आणि सराव करतानाही कोणत्या गोष्टी करायच्या व कोणत्या टाळायच्या ते पाहू.

  1. परीक्षेत प्रश्न लिहायचा नसतो. फक्त प्रश्न क्रमांक आकृतीजवळ लिहायचा असतो.
  2. आकृत्या काढण्यासाठी नेहमीची HB ग्रेडची पेन्सिल न वापरता H किंवा 2H पेन्सिल वापरावेत.
  3. कंपासमध्ये घालण्यासाठी पेन्सिल अर्धी कापून घ्या. पूर्ण लांबीच्या पेन्सिलचा वर्तुळ काढताना हाताला अडथळा होतो.
  4. पेन्सिल नेहमी अणकुचीदारच वापरा.
  5. कंपासचे पोलादी टोक बारकाईने तपासून पाहावे. कम्पास हातातून खाली पडल्याने किंवा धक्का लागल्याने ते वाकडे होते. अशा कंपासने वर्तुळ किंवा कंस कधीही काढू नये. ते टोक गिरमिटावर घासून सरळ व तीक्ष्ण बनवा.
  6. प्रत्येक आकृतीत रेषा व कंस काढताना दोन प्रकारच्या काढायच्या असतात. १. ठळक व २. फिकट.

प्रशनाचे उत्तर असेल तो आकार ठळक करा इतर सर्व रेषा, कंस इ. फिकट; पण दिसतील असे ठेवा. फिकट रेषा काढतानाच फिकट काढायच्या आहेत. आधी ठळक काढून मग खोडून फिकट करू नयेत. लक्षात ठेवा ठळक म्हणजे जाड नव्हे.

कर्तव्य भूमितीच्या परीक्षेत ५ आकृत्या काढायला सांगितलेल्या असतात. त्याच कागदावर मागच्या बाजूला अक्षरलेखनही करायचे असते. त्यामुळे अक्षरलेखन रंगविताना फक्त अक्षर रंगवावे. पार्श्वभूमी रंगवू नये. अन्यथा कागदाची मागील बाजू खराब होऊ शकते.

अक्षरलेखनासाठी सांगितलेला आकार कागदाच्या मध्यभागी काढावा. त्या आकाराच्या बाहेर अक्षराचा भाग जाता कामा नयेच पण त्याला स्पर्शही होता कामा नये. चारी बाजूंनी किमान अर्धा सेंटीमीटर इतका समास सोडावा.

(इंटर्मिजीएट परीक्षेत कागदाच्या मागील बाजूस दोन प्रश्न सोडवायचे असतात. अक्षरलेखन व घनभूमिती. यासाठी कागद उभा धरून कागदाच्या वरील अर्ध्या भागात अक्षरलेखन व खालील अर्ध्या भागात घनभूमिती करावी.)

अक्षराचा आकार, प्रकार, रंग हे त्या शब्दाच्या अर्थाला साजेसे , प्रमाणबद्ध व सुंदर दिसेल असे असावे. लक्षात असूद्या की या प्रश्नातून आपली अक्षरलेखनाची समज व क्षमता बघितली जाणार आहे. चित्रकलेची नव्हे. अक्षराला अतिशय थोडा पण अर्थपूर्ण असा चित्रकार तुम्ही जोडू शकता. पण हे करताना अक्षर वाचण्यात अडथळा येण्याचा धोका असतो. तो कौशल्याने टाळावा; अन्यथा अक्षराला कोणताही चित्राकार न जोडणे किंवा अक्षरासोबत कोणतेही चित्र न काढणे उत्तम.

अक्षरलेखनासाठी प्रश्नपत्रिकेत दिलेला शब्द ऱ्हस्व-दीर्घ/स्पेलिंग चूक न करता लिहायचा आहे. हा शब्द देवनागरी व रोमन लिपीत दिलेला असतो. कोणत्याही लिपीत आपण काढू शकतो.

पाचपैकी कोणत्याही चार आकृत्या काढा म्हटलेले असले तरी सर्व पाच आकृत्या काढा. म्हणजे त्यातील सर्वोत्तम चार आकृत्यांचे गुण विचारात घेतले जातील.

ही कर्तव्य भूमिती असल्याने शाळेत शिकवल्या जाणाऱ्या भूमितीप्रमाणे येथे रेषांना बाण काढायचे नसतात.

तुम्ही काढलेल्या आकृत्यामधिल फिकट रेषेला खूप महत्त्व दिले जाते.

त्यासाठी पाच आकृत्यांपैकी आकाराने सर्वात मोठी असलेली आकृती प्रथम व कागदाच्या मध्यभागी काढले तर इतर चार आकृत्या त्याच्या चार बाजूंना एक एक असे काढावेत .आकृत्यांचा आकार कागदावर बसेल अशा बेतानेच दिलेला असतो. त्यामुळे त्यात काहीही बदल करू नयेत.

सर्व प्रश्न प्रथम नीट वाचूनघेऊन. प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चारही भाषांमध्ये असते. त्यामुळे तुम्हाला एका भाषेतून अर्थ नीट न समजल्यास दुसऱ्या भाषेचा आधार घ्यावे. पर्यवेक्षकांना शक्यतो काहीही विचारू नयेत.इंटरमीजीएट परीक्षेत आणखी एक प्रश्न असतो तो म्हणजे घनभूमिती होय.

घन ,चतुष्कोनाकृती घन,सूची दंडगोल,शंकू, गोल या ६ मूलभूत भौमितिक घनाकारांपैकी कोणत्याही एकावर प्रश्न विचारले असते. त्याप्रमाणे त्या घनाकाराचे अनुविक्षेप व उद्विक्षेप योग्य पद्धतीने काढायचे असतात.

सर्व प्रश्न सोडविल्यानंतर पेपर परत एकदा तपासुन पहावे.सर्व प्रश्नास प्रश्न क्रमांक दिले आहे का? मापे व्यवस्थित लिहीले आहेत का? विभाग आ व ब हे नमुद केले आहे का? उत्तर पत्रिकेत नाव, विषय,दिनांक,बैठक क्रमांक इत्यादी माहिती भरली आहे का?पर्यवेक्षकाची उत्तर पत्रिकेत स्वाक्षरी झाली आहे का? खात्री करुन उपस्थिती पत्रिकेत स्वतः स्वाक्षरी करावे.

सर्व साहित्य असलेली कंपास पेटी,हाँल टिकेट,पेन, सर्व रंगसाहित्य, डिश ,ब्रश पाण्यासाठी मग,काँटन कपडा इत्यादी सोबत ठेवावे. सर्वच पेपरला वरील आवश्यक साहित्य सोबत घेऊन परीक्षा केंद्रावर आर्धा तास अगोदर उपस्थित रहावे.

Home
Elementary
Intermediate
Downloads
Author
Scroll to Top